पंचगंगा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाढू लागली आहे. त्याचबरोबर पंचगंगेचे पाणी प्रदूषित (Polluted) झाल्याने दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे पाणी काळपट झाल्याचे दिसत आहे. याकडे पाटबंधारे विभागाने वेळीच लक्ष देऊन पात्रातील जलपर्णी हटविण्याबरोबरच पाणी प्रदुषण रोखणे आवश्यक बनले आहे.
याप्रश्नी पाटबंधारे विभागाने तातडीने दखल घेऊन कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारास्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने देण्यात आला आहे. पंचगंगा नदी पात्रामध्ये कोल्हापूर-इचलकरंजी येथील मैलामिश्रित सांडपाणी मिसळत असल्याने पाणी मोठ्या प्रमाणात दूषित बनले आहे.
त्याचबरोबर पात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाढत आहे. पाणी काळेकुट्ट बनल्याने दुर्गंधी पसरत आहे. यामुळे सदर पिण्यास आणि शेतीस वापरणे दुरापास्त झाले आहे.हा प्रश्न दरवर्षी भेडसावतो. या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून वेळोवेळी मोर्चा, आंदोलने, घेरावो घालून निवेदने देऊन प्रश्नाची सोडवणूक व्हावी अशी मागणी केली जाते.
चालू उन्हाळ्यात देखील हा प्रश्न आवासून उभारला आहे. नदीतील पाणी मोठ्याप्रमाणात प्रदुषित (Polluted) झाल्याने सदर पाणी पिण्यास तसेच शेतीसाठी वापरणेही अवघड बनल्याने नागरिक तसेच शेतकरी वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे.पाटबंधारे विभागाने तातडीने या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.अन्यथा जलपर्णी वाढत जाऊन कुरुंदवाड शिरढोण पुलावर मोठ्या प्रमाणात धोका निर्माण होतो.
तेव्हा याकडे शासनाने ताबडतोब लक्ष द्यावे. त्याचबरोबर राधानगरी काळम्मावाडी धरणातून स्वच्छ व मुबलक पाणी पंचगंगा नदीपात्रात सोडावे अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिरोळ तालुका पदाधिकारी यांच्याकडून केली जात आहे. याबाबतचे निवेदन देण्यात आले असून या निवेदनावर विश्वास बालिघाटे, योगेश जीवाचे, पिंटू औरवाड, अविनाश गुदले, बाहुबली पाटील, विजय नाईक, आप्पासाहेब लांडगे, काशिनाथ नाईक आदी कार्यकत्यांच्या स्वाक्षरी आहेत.