संरक्षण मंत्रालयानं मोठा निर्णय घेत चीन आणि पाकिस्तान सीमेवर लक्ष ठेवण्यासाठी भारतीय लष्कराच्या 4000 कोटी रुपयांच्या टेहळणी उपग्रहाच्या (Satellite) प्रस्तावाला मंजुरी दिली. यामुळं भारतीय लष्कराच्या क्षमतेत मोठी वाढ होणार आहे. मंगळवारी झालेल्या संरक्षण अधिग्रहण परिषदेच्या बैठकीत मेड इन इंडियाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
ते म्हणाले की, हा उपग्रह भारतीय लष्करासाठी समर्पित करण्याचा निर्णय भारतानं घेतला आहे. हा प्रकल्प GSAT 7B उपग्रहासाठी असेल. हे भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) च्या भागीदारीत केले जाईल. त्यामुळं भारतीय लष्कराला सीमावर्ती भागात पाळत ठेवण्यास मदत होणार आहे.
हे वाचा : पंचगंगेचे पात्र जलपर्णीने वेढले प्रदूषित (Polluted) पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात
भारताच्या पाकिस्तान आणि चीन सीमेवर या देशांकडून घुसखोरीच्या घटना नेहमी घडत असतात. तसंच, आंतरराष्ट्रीय पातळीवर चीनचं भौगोलिक सीमा विस्तारण्याचं धोरण सर्व जगाला परिचित आहे. चीनकडून अनेक दशकांपासून भारताचा काही भूभाग बळकावण्याचा प्रयत्न होत आलेला आहे.
पाकिस्तानही दहशतवादाच्या मार्गाने सतत भारताच्या हिताला आणि राष्ट्रीय अस्मितेला धोका पोहोचवत असतो. दिवसेंदिवस चीन आणि पाकिस्तानच्या कारवाया वाढत असल्यानं या दोन देशांशी लगत असलेल्या भारतीय सीमांवर पहारा ठेवणं, टेहळणी (Satellite) करणं आणि या देशांच्या उपदव्यापांविषयी जागरूक राहणं अत्यंत आवश्यक आहे. या दृष्टीनं हा खास उपग्रहाचा निर्णय अगदी समयोचित ठरणार आहे.