Wednesday, April 23, 2025

Crime News डोळ्यांदेखत होत होते चिमुरडीचे अपहरण; प्रसंगावधान राखत असा उधळला डाव

लोणावळा-पुणे लोकलच्या मोटारमनने दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे दहा वर्षीय मुलीच्या अपहरणाचा (Crime) प्रयत्न फसला. शनिवारी रात्री लोकल पुणे स्टेशनजवळ आल्यानंतर मुलीचा ओरडण्याचा आवाज आल्याने मोटारमनने आपत्कालीन ब्रेक दाबून आवाजाच्या दिशेने धाव घेतली. त्या वेळी लोको शेडजवळ एक जण मुलीचे तोंड दाबून घेऊन जात असल्याचे दिसले. ते पाहून मोटारमनने प्रवाशांच्या मदतीने मुलीची सुटका केली.

महमंद रफीक अमीर सुलेमानी (वय ५५) असे या मोटारमनचे नाव आहे. ३४ वर्षांपासून ते लोणावळा ते पुणे या मार्गावर मोटारमन म्हणून कार्यरत आहेत. शनिवारी रात्री दहा वाजून पाच मिनिटांनी लोणावळा ते पुणे ही लोकल घेऊन ते पुणे स्टेशनच्या दिशेने जात होते. पुणे स्टेशन जवळ आल्यानंतर त्यांना लोको शेडजवळ लहान मुलीचा ओरडण्याचा आवाज ऐकू आला.

त्यांनी केबिनमधून बाहेर पाहिले असता एक व्यक्ती दहा ते अकरा वर्षाच्या मुलीचे तोंड दाबून नेत असल्याचे दिसले. त्यांनी लोकलचा आपत्कालीन ब्रेक दाबून गाडी थांबवली. प्रवाशांसह तत्काळ खाली उतरून अपहरणकर्त्याला (Crime) पकडण्याचा प्रयत्न केला.सुलेमानी आणि प्रवासी आपल्या दिशेने पळत येत असल्याचे पाहून आरोपी मुलीला तेथेच टाकून अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला.

मुलीला ताब्यात घेऊन सुलेमानी यांनी केबिनमध्ये बसविले आणि धीर दिला. आपण आईसोबत महालक्ष्मी एक्स्प्रेसने सांगलीजवळील किर्लोस्करवाडी येथे निघालो होते. रेल्वे प्लॅटफॉर्मवरून माणसाने जबरदस्तीने उचलून आणले, असे या मुलीने सुलेमानी यांना सांगितले.

ते ऐकून सुलेमानी यांनी त्वरित प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर धाव घेतली. मुलीच्या आईचा शोध घेऊन त्यांच्या ताब्यात मुलीला दिले. आईला पाहताच मुलीने हंबरडा फोडला. सुलेमानी यांनी या प्रकाराची माहिती स्टेशनमास्तर आणि अन्य अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर लोहमार्ग पोलिस आणि आरपीएफ पोलिसांना पाचारण करण्यात आले.

Smart India
Smart India
Smart India is a Professional News Platform. Here we will provide you with only interesting content, which you will like very much.We're dedicated to providing you the best of News, with a focus on dependability and Daily Update.

हे वाचा

राशी भविष्य

अध्यात्म