तेलंगणाची राजधानी हैदराबादला लागून असलेल्या सिकंदराबादमध्ये इलेक्ट्रिक बाइकच्या (electric bike) शोरूमला आग लागली आहे. बघता बघता या आगीने रौद्ररूप धारण केल्याने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. दरम्यान अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांनी ही आग आटोक्यात आणली. परंतु रात्री उशिरा घडलेल्या या घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला. याचबरोबर अन्य काही लोक यामध्ये अडकले होते त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे.
अतिरिक्त डीसीपी, उत्तर विभाग, हैदराबाद यांनी दिलेल्या माहितीनुसार, शॉर्ट सर्किटमुळे सिकंदराबादमधील पासपोर्ट कार्यालयाजवळील इलेक्ट्रिक बाइक (electric bike) शोरूममध्ये आग लागली. शोरूमच्यावर लॉज आहेत, ज्यामध्ये अनेक लोक अडकले होते. या घटनेत आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली दरम्यान अद्यापही घटनास्थळी बचावकार्य असल्याचेही ते म्हणाले.
याबाबत तेलंगणाचे गृहमंत्री यांनी या घटनेचा आढावा घेतला यावर ते म्हणाले कि, ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. अग्निशमन दलाच्या पथकांनी लॉजमधून लोकांना बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पण धुरामुळे काही लोकांचा मृत्यू झाला. लॉजमधून काही जणांची सुटका करण्यात आली. ही घटना कशी घडली याचा आम्ही तपास करत आहोत. नागरिकांनी घाबरून न जाता सहकार्य करावे असे मोहम्मद अली म्हणाले.
या ठिकणी घडला होता घडला असाच प्रकार
तमिळनाडूमध्ये एप्रिल महिन्यात अशीच एक घटना घडली होती. तामिळनाडूतील पोरूर-कुंदरातूर शोरूममध्ये एका ग्राहकाने आपल्या ई-बाईकची बॅटरी चार्ज (electric bike) करण्यासाठी लावली होती. काही वेळातच आग लागली. हळूहळू संपूर्ण शोरूम आगीत जळून खाक झाले. या घटनेत 5 नवीन इलेक्ट्रिक स्कूटर आणि सर्व्हिसिंगसाठी आलेल्या 12 जुन्या इलेक्ट्रिक स्कूटर जळून खाक झाल्या होत्या.
आग लागल्यानंतर शोरूममधून धुराचे लोट उठू लागल्याचे पाहून लोक घाबरले. या घटनेनंतर परिसरातील नागरिक रस्त्यावर आल्याने वाहतूक कोंडी झाली होती. त्यानंतर पोलिसांच्या मदतीने जमाव हटवण्यात आला होता. मात्र, आगीच्या या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. स्थानिक लोकांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली, मात्र त्यापूर्वीच संपूर्ण शोरूम जळून खाक झाले होते.