नातेवाईकाच्या अंत्यसंस्कारासाठी (Funeral) गेलेले सहा जण गंगा नदीत बुडाल्याची धक्कादायक घटना सोमवारी रात्री पश्चिम बंगालमधील कोलकाता शहरात घडली आहे. दरम्यान, तिघांना वाचवण्यात यश आले असून, तीन जण अद्याप बेपत्ता आहेत.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि आपत्कालीन पथक घटनास्थळी दाखल झाले. आपत्कालीन पथकाकडून तिघांचा शोध सुरु आहे.कोलकाता येथील बोलियाघाटाहून नीमतला स्मशानात गंगा नदीच्या काठावर नातेवाईकाच्या अंत्यसंस्कारासाठी (Funeral) काही लोक सोमवारी रात्री 11.15 वाजता जमले होते. यावेळी अंत्यसंस्काराला आलेले सहा तरुण नदीच्या पाण्यात उतरले.
यावेळी गंगा घाटावर तैनात पोलीस कर्मचाऱ्याने या तरुणांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र तरुणांनी ऐकले नाही आणि ते पाण्यात उतरले. यावेळी नदीच्या पाण्याच्या प्रवाहात सहा जण वाहून जाऊ लागले. स्थानिक नागरिकांनी तिघांना वाचवले. मात्र तिघे जण वाहून गेले.
घटनेची माहिती मिळताच कोलकाता पोलिसांचे डायव्हिंग पथक घटनास्थळी पोहोचले आणि नदीत बुडालेल्या लोकांचा शोध सुरू केला. मात्र रात्री उशिरापर्यंत शोध घेऊनही त्यांचा थांगपत्ता लागला नाही. मंगळवारी पुन्हा एकदा त्यांचा शोध सुरू आहे.
नदीला भरती येण्यापूर्वी घोषणा करूनही सहा जण तेथून हटले नाहीत. गंगा घाटावर बसून हे तरुण सेल्फी घेत होते, असा आरोप आहे. भरतीच्या येणार असल्याची घोषणा करूनही ते तिथेच बसून राहिले, त्यानंतर गंगेच्या प्रवाहात ते वाहून गेले.
स्थानिक नागरिकांच्या मदतीने तिघांना वाचवण्यात यश आले. मात्र बाकी तिघे नदीच्या प्रवाहात वाहून गेले. पाण्याचा वेग मोठा असल्याने बाकी तिघांना पाण्यातून बाहेर काढणे शक्य झाले नाही.