टीम इंडियाच्या वर्ल्ड कप (Cricket) मोहिमेला आज खऱ्या ्अर्थानं सुरुवात झाली. ब्रिस्बेनच्या गॅबा मैदानावर यजमान ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यात टीम इंडियानं दमदार फलंदाजी केली. रविवार 23 ऑक्टोबरला सुपर 12 फेरीत भारताचा सामना पाकिस्तानशी होणार आहे.
त्याआधी भारतीय संघ दोन सराव सामने खेळणार आहे. त्यातला पहिला सामना आज टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळली. या सामन्यात रोहित शर्मानं आपल्या टॉप 11 खेळाडूंना मैदानात उतरवलं होतं. पण युवा रिषभ पंतऐवजी टीम इंडियानं पुन्हा एकदा दिनेश कार्तिकवर विश्वास टाकला.
ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन फिंचनं टॉस जिंकून टीम इंडियाला (Cricket) बॅटिंग करण्याचं आमंत्रण दिलं. त्यानंतर भारतीय संघानं लोकेश राहुल आणि सूर्यकुमारच्या अर्धशतकांच्या जोरावर 20 ओव्हर्समध्ये 7 बाद 186 धावा स्कोअर बोर्डवर लावल्या. टीम इंडियाचा उपकर्णधार आणि सलामीवीर लोकेश राहुलनं भारतीय संघाला दमदार सुरुवात करुन दिली.
त्यानं पहिल्या ओव्हरपासूनच ऑस्ट्रेलियन गोलंदाजांवर आक्रमण केलं. राहुलनं कॅप्टन रोहित शर्मासह पहिल्या विकेटसाठी 78 धावांची भागीदारी केली. त्यात राहुलचा वाटा होता 33 बॉलमध्ये 57 धावांचा. त्यात त्यानं 6 फोर आणि 3 सिक्सर्स ठोकले. राहुलनं आपलं अर्धशतक 27 बॉल्समध्ये पूर्ण केलं.
राहुलनंतर फॉर्मात असलेल्या सूर्यकुमार यादवनंही गॅबाच्या मैदानावर चौफेर फटकेबाजी केली. आशिया कपपासून सूर्याच्या बॅटमधून सुरु असलेला धावांचा ओघ कायम आहे. सूर्यानं कांगारुंविरुद्धच्या या सामन्यातही आणखी एक अर्धशतकी खेळी केली. त्यानं 33 बॉल्समध्ये 6 फोर आणि एका सिक्ससह 50 धावा फटकावल्या. सूर्यासह कॅप्टन रोहितनं 15, विराटनं 19 तर दिनेश कार्तिकनं 20 धावा केल्या. पण हार्दिक पंड्या अवघ्या 2 धावा काढून माघारी परतला.
ऑस्ट्रेलियाकडून (Cricket) केन रिचर्ड्सन सर्वात यशस्वी बॉलर ठरला. त्यानं 30 धावात 4 विकेट्स घेतल्या. याशिवाय स्टार्क, मॅक्सवेल आणि अॅगरनं प्रत्येकी एक विकेट घेतली. दरम्यान टीम इंडियाची फलंदाजी पाहता आगामी सुपर 12 मुकाबल्यांसाठी भारतीय संघ सज्ज असल्याचं दिसतंय. पाकिस्ताविरुद्धच्या महामुकाबल्यातही भारतीय फलंदाजांकडून अशाच प्रकारच्या फलंदाजीची अपेक्षा राहील.