बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित ‘अवतार २’ अर्थात ‘अवतार द वे ऑफ वॉटर’ हा चित्रपट (Movie ) प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत होते. ‘अवतार २’ची घोषणा झाल्यापासून या चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढाली होती. मात्र, आता या चित्रपटाला देखील पायरसीचं ग्रहण लागलं आहे. ‘अवतार द वे ऑफ वॉटर’ थिएटरमध्ये रिलीज होताच इंटरनेटवर देखील लीक झाला आहे. अनेकांनी हा चित्रपट ऑनलाईन डाऊनलोड होत असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे.
‘अवतार द वे ऑफ वॉटर’ हा चित्रपट सर्वत्र रिलीज होण्या आधी या चित्रपटाचे काही खास शो प्रेक्षकांसाठी आयोजित करण्यात आले होते. चित्रपटाच्या या प्रिव्ह्यू शोमध्येच या चित्रपटाचे मोबाईलने शूटिंग केले गेले आहे. या चित्रपटाची ही मोबाईलमध्ये शूट केलेली व्हिडीओ प्रिंट सध्या टोरेंट साईट्सवरून डाऊनलोड करता येतेय. मात्र, ही प्रिंट खराब आहे. मीडिया रिपोर्ट नुसार, गुरुवारीच हा चित्रपट इंटरनेटवर लीक झाला असून, अनेक लोक तो डाऊनलोड करून पाहात आहेत.
आता ‘अवतार द वे ऑफ वॉटर’ हा चित्रपट (Movie ) सर्वत्र प्रदर्शित झाला असून, पुन्हा एकदा हा चित्रपट पायरसी कॉपी होण्याची शक्यता वाढली आहे. अर्थात आता चित्रपट थेट थिएटरमध्ये रिलीज झाल्याने अशा अनेक कॉपी इंटरनेटवर लीक होऊ शकतात. या प्रिंट्स खराब असल्या, तरी लोक डाऊनलोड करून बघत आहे. तर, काही सुजाण प्रेक्षक आपली पावलं थिएटरकडे वळवत आहेत. पेंडोराची जादुई दुनिया मोठ्या पडद्यावर बघण्याचा अनुभव घेण्यासाठी प्रेक्षक थिएटरमध्ये गर्दी करत आहेत.
‘अवतार द वे ऑफ वॉटर’ या चित्रपटाची क्रेझ प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळत आहे. या चित्रपटाचा पहिला भाग ‘अवतार’ हा चित्रपट २००९मध्ये रिलीज झाला होता. तब्बल १३ वर्षांनी या चित्रपटाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाची कथा देखील खास असणार आहे. आपला ग्रह आणि पेंडोरा दुनिया वाचवण्यासाठी सुरु असलेला संघर्ष या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचं तिकीट इतर चित्रपटांच्या तुलनेत महाग असलं, तरी प्रेक्षक या चित्रपटासाठी गर्दी करत आहेत.