दारुच्या नशेत एक तरुण महावितरणाच्या दीडशे फूट उंच टॉवरवर चढला. आणि त्याला उतरविण्यासाठी तब्बल दहा तास लागले. पिंपरी चिंचवड जवळील आळंदी परिसरातील केळगाव येथे ही घटना घडली. आळंदी पोलीस, महावितरण आणि पिंपरी चिंचवड अग्निशामक (Firefighter) दलाच्या प्रयत्नानंतर तब्बल दहा तासांनी टॉवरवर चढलेल्या तरुणाची सुटका करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (19 मार्च) रात्री दहा वाजताच्या सुमारास एक अनोळखी तरुण केळगाव येथील महावितरणाच्या 150 फूट उंच टॉवरवर चढला. याबाबतची माहिती मिळाल्यावर आळंदी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. खबरदारीचा उपाय म्हणून त्या ठिकाणचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला. त्या तरुणाला वारंवार विनंती केल्यावरही तो खाली उतरत नव्हता.
आळंदी येथील अग्निशामक दल देहू येथील तुकाराम बीजेकरिता गेले असल्याने आळंदी नगर परिषदेचे मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी पिंपरी चिंचवड अग्निशामक (Firefighter) दलास रविवारी सकाळी सात वाजताच्या दरम्यान वर्दी दिली. त्यानुसार 54 मीटर उंच शिडी असलेले पथक घटनास्थळी दाखल झाले.
मात्र शिडी लावून त्यास खाली उतरविण्यासाठी जागा नव्हती. त्यामुळे रेस्क्यू रोप, हार्नेस आणि जम्पिंग शीट यांचा वापर करुन पोलीस आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी त्याची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. अखेर तरुणाला सकाळी आठ वाजताच्या सुमारास खाली उतरविण्यात आलं.
किशोर दगडोबा पैठणे असे सुटका करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. तो वाघोली येथील रहिवासी आहे. अग्निशामक विभागाचे प्रमुख किरण गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली लिडिंग फायरमन भाऊसाहेब धराडे, वाहन चालक रुपेश जाधव, फायरमन सारंग मंगळूरकर, विकास नाईक, अग्निशामक (Firefighter) प्रशिक्षणार्थी पृथ्वीराज नलावडे, सतीश भोर, विकास कुटे, सुशील चव्हाण, विकास दाभाडे, पायल नालट यांनी बचावकार्य सुरक्षितरित्या पार पाडले. महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता गिरीश पंतोजी यांनी घटनास्थळी हाय टेन्शन लाईनचा विद्युत पुरवठा खंडित केला. तर पोलीस उपनिरीक्षक गांगड सहाय्यक निरीक्षक गाडेकर व डोईफोडे, कर्मचारी जाधव, रासकर, साळुंखे यांनी रात्रभर पहारा दिला.