यड्राव फाटा येथे एका पानपट्टी दुकान चालकावर कोयत्याने वार करून त्याची हत्या (Crime) केल्याची घटना रात्री घडली आहे. हल्लेखोर फरार झाले आहेत. तेजस विजय डांगरे (वय २०) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.पूर्ववैमनस्यातून हा खून झाल्याचे बोलले जात आहे.
याबाबत माहिती अशी कि, इचलकरंजी येथील अण्णा रामगोंडा शाळेजवळ राहणाऱ्या तेजस डांगरे यांचे सांगली रोड यड्राव फाटा येथे पान शॉप आहे. तेजस डांगरे आणि हल्लेखोर यांच्यात जुना वाद होता. या वादातून त्यांनी डांगरे यास यड्राव फाट्यासमोर असणाऱ्या पेट्रोल पंपासमोरील रमेश वडा या दुकानसमोर बोलावून घेतले.
यावेळी हल्लेखोरांनी (Crime) त्याच्यासोबत वाद केला. या वादाचे रूपांतर भांडणात झाले. त्यानंतर पाच ते सहा जणांच्या जमावातून एकाने तेजस डांगरे याच्यावर कोयत्याने डोक्यात व अंगावर वार केले. यामध्ये तेजस डांगरे गंभीर जखमी झाला. रक्तबंबाळ झाल्याचे पहाताच हल्लेखोरांनी घटनास्थळाहून पळ काढला. त्यानंतर डांगरे याला उपचारासाठी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे जाहीर करण्यात आले.
हे वाचा : राज्यात अद्यापही कमी दाबाचा पट्टा सक्रीय, मुसळधार पावसाची शक्यता
घटनास्थळी शहापूर पोलीस दाखल झाले. सहायक फौजदार कोळी, पोलीस हवालदार मुंगसे, प्रसन्न कांबळे, महेश कांबळे, अर्जुन फातले, असिफ कलेगार पोहोचले. त्यांनी तात्काळ पंचनामा केला. तसेच ठसे तज्ञांना बोलावून नमुने घेतले असून संशयित आरोपीची शोध मोहीम सुरू केली आहे. हल्ल्याचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. याप्रकरणी रात्री उशीरा गुन्हा (Crime) नोंद करण्याचे काम सुरू होते.