मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी काल गोव्यात होता. दरम्यान, वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला सिंधुदूर्ग जिल्ह्यातील भोगवे समुद्र किनारी आपल्या मित्र परिवारासोबत तो दाखल झाला होता. यावेळी समुद्र किनाऱ्याचा आनंद लुटताना सचिन तेंडुलकरने क्रिकेट खेळण्याचा देखील आनंद लुटला. भोगवे येथील समुद्र किनाऱ्यावर मित्रांसमवेत क्रिकेट खेळतानाचा सचिनचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय. यात सचिनने त्याच्या खास शैलीत फटकेबाजी केली.
सचिनने त्याचा वाढदिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या पर्यटन स्थळांना भेट देत साजरा केला. परुळे भोगवे इथल्या हॉटेलमध्ये त्यानं मुक्काम केला. तसंच किल्ले निवती भोगवे सागर किनारी त्याने संध्याकाळी फेरफटका मारला. क्रिकेटच्या देवाची भेट झाल्यानं किनाऱ्यावर चाहत्यांनाही आनंद झाला. सचिनने सर्वांसोबत फोटोही काढले.
वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला भोगवे किनाऱ्यावर सचिनने क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. क्रिकेटच्या निमित्ताने जगभर फिरून झालं, मात्र भोगवे-निवतीसारख्या सुंदर स्वच्छ किनाऱ्यावर फिरताना खूप आनंद झाला असंही सचिनने म्हटलं. सचिन तेंडुलकर, त्याची पत्नी अंजली आणि मुलगी सारा यांच्यासोबत गोवा विमानतळावर दिसला होता. तेव्हा सारा एका महिला चाहतीसोबत सेल्फी काढताना दिसली. त्यांचा विमानतळावरचा फोटोही व्हायरल होत आहे.
सचिनने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत अनेक विश्वविक्रम केले जे आजही अबाधित आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने 34 हजारहून जास्त धावा केल्या. त्याच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शतकांचा विक्रम आहे. सचिनला देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्नने गौरवण्यात आलं आहे.