HDFC Bank Home Loan| एचडीएफसी बँकेने पुन्हा एकदा आपल्या ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. एचडीएफसी बँकेचे गृहकर्ज पुन्हा महागले आहे. त्यानुसार आता रेपो-लिंक्ड गृहकर्जाच्या व्याजदरात 10-15 बेसिस पॉइंट्सने वाढ केली आहे.रेपो दर स्थिर असूनही या वर्षात गृहकर्जाच्या दरात तिसऱ्यांदा वाढ केली. या वाढीमुळे व्याजदर 8.70 ते 9.8 टक्के इतका झाला आहे.
बँकेच्या वेबसाइटवरून मिळालेल्या माहितीनुसार, एचडीएफसी लिमिटेडचे आणि एचडीएफसी बँकेत विलीनीकरणामुळे गृहकर्ज दरांमध्ये हा बदल झाला आहे. मात्र रिझर्व्ह बॅंकेने गेल्या वर्षी एप्रिलपासून रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही. एचडीएफसी बँकेने नव्याने मंजूर केलेल्या कर्जांसाठी हे नवीन दर (HDFC Bank Home Loan) लागू होणार आहेत. त्याचा जुन्या कर्जदारांवर कोणताही परिणाम होणार नाही.
याबाबत मॉर्टगेज वर्ल्डचे संस्थापक विपुल पटेल म्हणाले, “एचडीएफसी बँकेच्या विलीनीकरणाआधी एचडीएफसी 8.30 ते 8.45 टक्के व्याजदराने गृहकर्ज देत होती. विलीनीकरणानंतर, एचडीएफसी बँक पोर्टफोलिओ स्तरावर गृहकर्जावरील व्याजदरात वाढ करत आहे. त्याचा वाढता खर्च हे यामागचे कारण आहे.”
किती टक्क्यांनी वाढणार व्याजदर ?
यापूर्वी 50 लाख रुपयांच्या गृहकर्जावरील किमान व्याजदर जानेवारीमध्ये 8.35 टक्के होता, तर आता किमान गृहकर्ज दर 8.70 टक्के इतका असणार आहे. त्यामुळे, तीन महिन्यांच्या कालावधीत, एचडीएफसी बँकेने गृहकर्जाच्या दरात 35 आधारबिंदूंची वाढ केली आहे.
आयसीआयसीआय बँकेचे सध्याचे गृहकर्ज व्याजदर (HDFC Bank Home Loan) 9 टक्के ते 10.05 टक्के दरम्यान आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियाचे गृहकर्ज दर 9.15 टक्के ते कमाल 10.05 टक्के आहेत. तसेच ॲक्सिस बँक आपल्या ग्राहकांना 8.75 ते 9.65 टक्के पर्यंत गृहकर्जावरील तुलनेने कमी व्याजदर देत आहे. कोटक महिंद्रा बँकेच्या गृहकर्जाचा प्रारंभिक व्याजदर 8.70 टक्के आहे. सार्वजनिक क्षेत्रातील स्टेट बँक, बँक ऑफ बडोदा आणि बँक ऑफ इंडियाने मात्र कर्जदरात कोणतीही वाढ केलेली नाही.
आरबीआयने नवीन आर्थिक वर्षासाठी (2024-25) चलनविषयक धोरण समितीच्या (MPC) द्वि-मासिक बैठकांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. मात्र त्यापूर्वीच HDFC बँकेने आपल्या गृहकर्जावरील व्याजदरात वाढ केली आहे.