दिवळीसाठी (Diwali) मागील दोन-तीन दिवसांपासून अनेकजण आपल्या घराकडे निघताना दिसत आहेत. त्यामुळे रस्त्यावर वाहनांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. अशातच आता उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथे भरधाव वेगात असलेली कार कंटेनरवर आदळल्याने कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.
सर्व मृत व्यक्ती एकाच कुटुंबातील असल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर नागरिकांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून सर्वांना बाहेर काढलं आणि रुग्णालयात नेलं, तिथे डॉक्टरांनी पाचही जणांना मृत घोषित केलं.
मिळालेल्या माहितीनुसार, बस्ती जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावर ही घटना घडली. दिवाळीनिमित्त (Diwali) कारमधून हे कुटुंब संत कबीर नगर येथील त्यांच्या घरी जात होते. त्याचवेळी घरापासून 30 किमी अंतरावर राष्ट्रीय महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकवर कार आदळली.
हे वाचा : कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ, चेक करा पेट्रोल डिझेलचे नवे दर …
कारचा वेग इतका होता की, ट्रकमध्ये शिरताच कारचा स्फोट झाला. यात कारमधील एकाच कुटुंबातील 5 जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर माहिती मिळताच पोलीस पोहोचले, त्यांनी तात्काळ कारमधील लोकांना गॅस कटरच्या सहाय्याने बाहेर काढलं आणि त्यांना जिल्हा रुग्णालयात नेलं. तिथे डॉक्टरांनी सर्वांना मृत घोषित केलं.
या भीषण अपघाताची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा आढावा घेतला. पोलीस अधीक्षक आशिष श्रीवास्तव यांनी सांगितलं की, घटनेची पाहणी केल्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन शवागारात ठेवण्यात आले असून आज त्यांचे शवविच्छेदन होणार आहे. या घटनेची माहिती मृतांच्या नातेवाईकांना देण्यात आली आहे. या घटनेबाबत गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात येत आहे.