औरंगाबादमधील वाळूज भागात तीन महिन्यांपासून बंद असलेल्या एका घराच्या स्वयंपाक (Crime) घरात मिठात पुरलेला सांगाडा आढळल्याने खळबळ उडाली होती. मात्र, आता घरात मिठात पुरलेल्या अवस्थेत आढळलेल्या मृतदेहाचं रहस्य उलगडले आहे. पोलिसांनी फरार असलेल्या भाडेकरूला तब्यात घेतले आहे. चौकशीत आजाराने ग्रासलेल्या पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या अंत्यसंस्कारासाठी पैसे नसल्याने तिचा मृतदेह मिठात पुरला, अशी माहिती पतीने पोलिसांना दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वाळूजच्या समता कॉलनीमध्ये भाड्याने राहणाऱ्या काकासाहेब भुईगड यांच्या बंद खोलीत मिठात पुरलेल्या अवस्थेत मानवी मृतदेह आढळला होता. पोलिसांनी तो मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला असता तो महिलेचा मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, पोलिसांनी फरार असलेल्या काकासाहेब भुईगड याला पंढरपूर परिसरातून ताब्यात घेतले आणि त्याची अधिक विचारपूस केली.
हे वाचा : ‘अवतार द वे ऑफ वॉटर’ला पायरसीचं ग्रहण; रिलीज होताच इंटरनेटवर लीक झाला चित्रपट!
तो पुरलेला मृतदेह त्याच्या आजारी पत्नी अनिता भुईगड हिचा असल्याचे सांगितले. अनिता ही आजारी होती तीने मृत्यूपूर्वी सुमारे दीड महिन्यापासून अन्नत्याग केला होता आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर अंत्यसंस्कारासाठी पैसे नसल्याने अनिताचा मृतदेह (Crime) घरातच मिठ टाकून पुरला असे काकासाहेब याने पोलिसांना सांगितले आहे. दरम्यान, शवविच्छेदन अहवालाची पोलीस प्रतीक्षा करत आहेत.
मृतदेहाच्या अंगावर जखमांचे काहीही निशाण नाहीत, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.शिवाय काकासाहेब भुईगड हा खरं बोलत आहे की काही लपवत आहे. याबाबत देखील पोलीस सर्व दिशेने तपास करत आहेत. मात्र, सध्या या प्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पतीने सासूच्या मदतीने पुरला पत्नीचा मृतदेह
अनिताचा मृत्यू झाल्यावर अंत्यसंस्कारासाठी पैसे नसल्याने भुईगड याने ही माहिती आपल्या सासूला दिली. त्यानंतर दोघांनी मिळून अनिताचा मृतदेह (Crime) घरातच पूरला. कुणाला संशय येऊ नये म्हणून त्या जागेवर दोन शेंदूर फासलेले दगड ठेवले अशी कबूली भुईगड याने पोलिसांना दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
भुईगड हा पूजारी की मंत्रिक?
भुईगड हा लोकांच्या घरात जाऊन पूजा करतो. परिसरात कुणी त्याला पूजारी म्हणून ओळखतो तर कुणी मंत्रिक असं म्हणतात. भुईगडला भक्तीचं वेड आहे. मात्र, अशी देखील चर्चा आहे की भुईगडला जादू टोण्याचे प्रकार पाहण्याची सवय होती. दरम्यान, अहवालानंतर अनिताचा मृत्यू कसा झाला हे स्पष्ट होईल. मात्र पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत