पॅरासिटामॉल गोळ्यांचा ओव्हरडोजमुळे 27 वर्षीय तरुणाचा मृत्यू (Death) झाल्याचं समोर आलं आहे. या तरुणावर तब्बल 40 दिवस उपचार करण्यात आले. मात्र डॉक्टरांना त्याला वाचविण्यात यश आले नाही. याप्रकरणी वर्धा शहर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रजत मेंढे (27) असे मृत तरुणाचे नाव असून तो शिवाजी चौक वर्धा येथील रहिवासी आहे.
वर्ध्याच्या एका खासगी फायनान्स कंपनीमध्ये तो सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होता. रजत मेंढे हा 29 जानेवारी रोजी रात्री कर्तव्यावर आला. सकाळी तो तेथेच झोपून होता. 30 जानेवारी रोजी सकाळी त्याने वडिलांना फोनवर संपर्क साधत प्रकृती बिघडली असल्याची माहिती दिली. वडिलांनी वर्ध्यात येत त्याला सेवाग्राम रुग्णालयात उपचारासाठी नेले. सेवाग्राम रुग्णालयात रजतवर उपचार सुरू करण्यात आले.
डॉक्टरांनी विचारपूस केली असता, त्याने पॅरासिटामॉलच्या गोळ्या खाल्ल्याचे सांगितले. सेवाग्राम रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात आले. मात्र, 9 मार्च रोजी रजतचा मृत्यू (Death) झाला. याप्रकरणी सुरूवातीला सेवाग्राम पोलिसांत नोंद करण्यात आली. त्यानंतर प्रकरण वर्धा पोलिसांकडे आज वर्ग करण्यात आले. या प्रकारामुळे सामान्य नागरिकांत भितीचे वातवरण निर्माण झाले.
डॉक्टरांचा सल्ला न घेताच गोळ्या घेणे जिवावर बेतले