आपली मोठी बहीण (Sister ) आपली मार्गदर्शक, गुरु असते. ती आपल्याला अनेक चांगल्या गोष्टी शिकवते. आपण आपल्या आयुष्यात अनेक गोष्टी पहिल्यांदा करत असतो. अशावेळी आपली मोठी बहीण आपल्याला मार्गदर्शन करते. दोन बहिणींमधल्या प्रेमाची तुलना तर कधीच करता येणार नाही.
पण अहमदनगर जिल्ह्यातून एक भयानक घटना समोर आली आहे. प्रेम प्रकरणाबद्दल घरच्यांना माहिती दिली या रागातून मोठ्या बहिणीने लहान बहिणीची हत्या केल्याची धक्कादायक घटना अहमदनगर जिल्ह्यात घडली आहे. पोलिसांनी आरोपी बहिणीला बेड्या ठोकल्या आहेत.
कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण शिवारात 30 सप्टेंबर रोजी 16 वर्षीय तरुणीचा मृतदेह तिच्याच घरात ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला होता. प्रथमदर्शनी ही आत्महत्या असल्याचे भासत होते. मात्र ही मृतक मुलीची आत्महत्या नसून तिची हत्या (Crime) करण्यात आल्याचं उघड झालं.
विशेष म्हणजे ही हत्या मृतक मुलीच्या 19 वर्षीय मोठ्या बहिणीने केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.आरोपी मोठी बहीण (Sister ) सृष्टी हिचे श्रीरामपुर तालुक्यातील आकाश कांगुणे नामक तरुणासोबत प्रेमसंबंध होते. ती त्या तरुणासोबत पळून जाणार असल्याबद्दल तिच्या लहान बहिणीने घरच्यांना सांगितलं होतं.
त्यानंतर घरच्यांनी सृष्टीला समज दिली होती. तसेच काही दिवस कॉलेजला जाऊ नकोस अशी सक्त ताकीद दिली होती. त्यातूनच प्रेमात आंधळी झालेल्या सृष्टीने मागचा पुढचा कुठलाही विचार न करता ओढणीच्या सहाय्याने गळा आवळून लहान बहिणीची हत्या केली.
हत्येनंतर आरोपी सृष्टी ही प्रियकरासोबत ठरल्याप्रमाणे पळून गेली. कोपरगाव पोलिसांनी घटनेचा सखोल तपास करत आरोपी बहीण (Sister ) सृष्टी आणि तिचा प्रियकर आकाश कांगुणे यांना श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा येथून ताब्यात घेतले. शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त होताच मयताच्या आईच्या फिर्यादीवरून आरोपी सृष्टी बानकर हिच्यावर कलम 302 प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र आंधळ्या प्रेमापोटी मोठ्या बहिणीने सख्ख्या लहान्या बहिणीची हत्या केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.












