साऊथ इंडस्ट्रीतून एक अत्यंत दु:खद बातमी समोर आली आहे. दिग्गज तमिळ अभिनेते डॅनियल बालाजी यांचे वयाच्या ४८ व्या वर्षी निधन झाले. डॅनियल बालाजी यांचे शुक्रवारी हृदयविकाराने निधन झाले. त्यांना अचानक छातीत दुखू लागल्याने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अगदी कमी वयात अभिनेत्याचे निधन झाल्याने इंडस्ट्रीसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
डॅनियल बालाजी यांना चेन्नईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना वाचवण्याचा डॉक्टरांकडून प्रयत्न केला गेला मात्र सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले. अभिनेत्याच्या निधनाने चाहते आणि इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे.
डॅनियल बालाजी यांनी आपल्या करिअरची सुरुवात कमल हसन यांच्या Marudhanayagam या चित्रपटातून केली होती, जो कधीच प्रदर्शित झाला नव्हता. यानंतर ते टेलिव्हिजनकडे वळले. ‘चिट्ठी’ या मालिकेमुळे ते लोकांमध्ये प्रसिद्ध झाले. डॅनियल बालाजी यांनी आपल्या चित्रपट करिअरमध्ये एकापेक्षा एक सुपरहिट सिनेमे दिले आहेत.
डॅनियल बालाजी यांनी तमिळ आणि मल्याळम चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका केल्या आहेत. Vettaiyadu Vilaiyaadu, Polladhavam आणि Vada Chennai यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी केलेल्या उत्कृष्ट अभिनयासाठी त्यांना ओळखले जाते. साऊथ इंडस्ट्रीमध्ये त्यांनी कमल हासन, थलापति विजय आणि सूर्या अशा अनेक बड्या कलाकारांसोबत काम केले आहे.