Cricket – आयपीएल 2022 च्या मोसमाला 26 मार्चपासून सुरूवात होणार आहे. त्याआधी फिटनेसच्या समस्यांनी ग्रासलेल्या टीम इंडियाच्या खेळाडूंची आज बँगलोरच्या एनसीएमध्ये फिटनेस टेस्ट घेण्यात आली.यामध्ये ऑलराऊंडर हार्दिक पांड्या फिटनेस टेस्टमध्ये पास झाला, ज्यामुळे त्याचा आयपीएल खेळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
हार्दिक आयपीएलच्या गुजरात टायटन्सचा कर्णधार आहे. एकीकडे हार्दिक फिटनेस टेस्ट पास झाला असला तरी पृथ्वी शॉ मात्र या टेस्टमध्ये अपयशी ठरला आहे. दिल्ली कॅपिटल्सने रिटेन केलेला पृथ्वी शॉ यो-यो टेस्टमध्ये फेल झाला.पृथ्वीचा यो-यो स्कोअर 15 एवढा आल्याचं वृत्त आहे.
हा स्कोअर 16.5 आला तर खेळाडू यो-यो टेस्ट पास झाल्याचं ग्राह्य धरलं जातं. दिल्ली कॅपिटल्ससाठी हा धक्का असला तरी पृथ्वी शॉ आयपीएल खेळू शकेल, कारण तो बीसीसीआयच्या करारबद्ध खेळाडूंमध्ये नाही. बीसीसीआयशी करारबद्ध खेळाडू फिटनेस टेस्टमध्ये फेल झाला तर त्याला आयपीएल खेळता येत नाही.
पृथ्वी शॉ याआधी (Cricket) रणजी ट्रॉफी मॅच खेळत होता, त्यामुळे तो मॅच फिट आधीपासूनच आहे. मागच्या काही काळापासून पृथ्वी फॉर्मसाठी संघर्ष करत आहे, तसंच त्याच्या फिटनेसचीही समस्या आहे, त्यामुळे त्याला टीम इंडियातूनही डच्चू देण्यात आला.
पृथ्वी शॉ फिटनेस टेस्टमध्ये फेल झाला आणि आयपीएल खेळणार असला तरीही दिल्लीचं टेन्शन मात्र वाढलं आहे. पृथ्वी दिल्लीकडून ओपनिंग करतो, याशिवाय लिलावामध्ये दिल्लीने डेव्हिड वॉर्नरला विकत घेतलं होतं, पण वॉर्नरही सुरूवातीच्या काही सामन्यांसाठी उपलब्ध नाही.
ऑस्ट्रेलियाची टीम सध्या पाकिस्तान दौऱ्यावर आहे. हा दौरा संपल्यावर म्हणजेच एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात वॉर्नर खेळण्यासाठी उपलब्ध होईल. दुसरीकडे दिल्लीचा फास्ट बॉलर एनरिच नॉर्कियादेखील फिटनेसच्या समस्येने ग्रासला आहे. भारताविरुद्ध झालेल्या सीरिजमध्येही नॉर्किया दुखापतींमुळे खेळू शकला नव्हता. आता तो आयपीएलमध्येही खेळेल का नाही, याबाबत साशंकता आहे.