कोरोनानंतर आता जगभरात आणखी एका नव्या विषाणूचे (virus) टेन्शन आहे. अमेरिका, ब्रिटन आणि मोझांबिकमध्ये पोलिओचा विषाणू आढळला आहे. लंडनमध्ये एका भागातल्या सांडपाण्यात तर काही महिन्यांपूर्वी न्यूयॉर्कमध्येही पोलिओचा विषाणू आढळला होता. मोझांबिकमध्ये मे महिन्यात तर फेब्रुवारीत मलाविमध्ये विषाणू आढळला होता.
जगभरात कोरोना संकटामुळे काही काळ लसीकरण मोहीम ठप्प पडली होती. परिणामी पोलिओ विषाणूंचा प्रसार झाल्याचे म्हटले जात आहे. पण जगातल्या कोणत्याही भागात पोलिओचे विषाणू सापडणं हे सर्वांसाठी धोकादायक ठरु शकते, असं मत संशोधकांनी व्यक्त केले आहे.
दरम्यान, जुलै महिन्यांत न्यूयॉर्क येथील रॉकलँड कौंटीत राहणाऱ्या व्यक्तीत पोलिओचा विषाणू (virus) आढळून आला. त्याने लस घेतलेली नव्हती, अशी माहिती पुढे आली आहे. याशिवाय त्याच्या घराजवळ सांडपाण्यातही विषाणू आढळला. तसेच उत्तर आणि पूर्व लंडनमध्ये फेब्रुवारी आणि मे महिन्यात सांडपाण्यात पोलिओचा विषाणू सापडला.
मे महिन्यांत मोझांबिक येथे एका बाळात पोलिओचा विषाणू आढळून आला. तर फेब्रुवारीत मलावी येथे पोलिओच्या वेगळ्या प्रकारचा विषाणू आढळला होता. त्यामुळे आता चिंता व्यक्त होत आहे.
पोलिओ, किंवा पोलिओमायलिटिस हा एक प्राणघातक रोग आहे. हा पोलिओव्हायरसमुळे होतो. हा विषाणू एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरतो आणि एखाद्या व्यक्तीच्या पाठीच्या कण्याला इजा पोहोचवू शकतो, ज्यामुळे अर्धांगवायू होतो .
हे वाचा : एलॉन मस्क यांच्याकडे ट्विटरचा ताबा, या निर्णयानं हादरा
पोलिओवर कोणताही इलाज नाही, परंतु सुरक्षित आणि प्रभावी लसीकरणाने तो टाळता येऊ शकतो. इनएक्टिव्हेटेड पोलिओ लस ही एकमेव पोलिओ लस आहे जी 2000 पासून युनायटेड स्टेट्समध्ये दिली जात आहे. भारतात 0 ते 5 वयोगटापर्यंतच्या मुलांना मोफत लस देण्यात येत आहे.
जागतिक आरोग्य संघटनेची संस्था जागतिक पोलिओ निर्मुलन पुढाकारच्या संकेतस्थळानुसार शेवटचा पोलिओचा वेगळ्या प्रकारचा विषाणू हा अमेरिका आणि ब्रिटनमध्ये अनुक्रमे 1979 आणि 1982 मध्ये आढळून आला होता.