खाद्यपदार्थांच्या किमतीत वाढ झाल्यामुळे गेल्या पाच महिन्यांतील सर्वाधिक वाढीची नोंद करत सप्टेंबरमध्ये किरकोळ महागाई 7.41 टक्क्यांवर पोहोचली. ऑगस्टच्या तुलनेत महागाईच्या (inflation) दरात 0.41 टक्के वाढ झाली आहे.ऑगस्टमध्ये किरकोळ महागाईचा दर 7 टक्के इतका होता. त्यामुळे सर्वसामान्यांना पुन्हा महागाईचा झटका बसला आहे.
किरकोळ महागाईची आकडेवारी आज जाहीर करण्यात आली आहे. हा आकडा ग्राहक किंमत निर्देशांक म्हणजेच सीपीआयच्या आधारे जाहीर करण्यात आला आहे. सप्टेंबरमध्ये सीपीआयवर आधारित महागाई 7.41 टक्के आहे. बरोबर एक वर्षापूर्वी सप्टेंबर 2021 मध्ये हा दर 4.35 टक्के होता. ऑगस्टमध्ये हा दर 7 टक्के होता.
रिझर्व्ह बँकेच्या अंदाजापेक्षा सप्टेंबर महिन्यांत महागाईचा (inflation) दर जास्त आहे. रिझर्व्ह बँकेने चलनवाढीचा दर 6 टक्के निश्चित केला आहे, मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून हा दर 7 टक्क्यांच्या आसपास राहिला आहे. नुकतेच रिझर्व्ह बँकेने या दराबाबत चिंता व्यक्त केली होती.
रिझर्व्ह बँक फक्त किरकोळ महागाईच्या आधारावर रेपो दर वाढवते. महागाई अशीच सुरू राहिल्यास रिझर्व्ह बँकेला रेपो दरात पुन्हा वाढ करावी लागणार आहे. असे झाले तर कर्जाचे व्याजदर वाढून ईएमआयमध्येही वाढ होणार आहे.ऑगस्टमध्ये देशाच्या औद्योगिक उत्पादनात (आयआयपी) 0.8 टक्क्यांनी घट झाली आहे.
वर्षभरापूर्वी याच महिन्यात औद्योगिक उत्पादनात 13 टक्के वाढ झाली होती. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (एनएसओ) आज औद्योगिक उत्पादन निर्देशांकाची (IIP) आकडेवारी पाठवली. या आकडेवारीनुसार, ऑगस्ट 2022 मध्ये उत्पादन क्षेत्राचे उत्पादन 0.7 टक्क्यांनी घसरले. या व्यतिरिक्त खाण उत्पादनात 3.9 टक्क्यांनी घट झाली आहे.
महागाईचा (inflation) दर 6 टक्क्यांच्यावर राहिल्याने आरबीआयला केंद्र सरकारसमोर एक अहवाल सादर करावा लागणार आहे. या अहवालात महागाई नियंत्रित करण्यात अपयशी ठरण्याची कारणे स्पष्ट करावी लागणार आहेत. केंद्र सरकारने रिझर्व्ह बँकेला किरकोळ महागाई 2 ते 6 टक्क्यांच्या दरम्यान असावी, यासाठी प्रयत्न करावे, असे सांगितले होते. त्याचा हा दर 7 टक्के आणि त्याहून राहिला आहे.