इचलकरंजी शहर व परिसरात मंगळवारी पहाटेपासून परतीच्या पावसाने (Rain) जोरदार हजेरी लावल्याने संपूर्ण जनजीवन विस्कळीत होऊन गेले.एकसारख्या बरसणाऱ्या पावसाने जागोजागी पाणी साचून रस्त्यांना तळ्याचे स्वरुप आले होते. तर नोकरदार मंडळी व विद्याथ्र्यांची चांगलीच तारांबळा उडाली.
दरम्यान, जोरदार पावसामुळे कबनूर, चंदूर आणि आमराई रोड | परिसरात काळ्या ओढ्याला मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. शिवाय महावितरण कंपनीच्या कबनूर आणि हनुमाननगर या उपकेंद्रांमध्ये पाणी शिरले होते.पावसाळ्यात म्हणावी तशी हजेरी न लावलेल्या वरुणराजाने परतीच्या काळात जोरदार बरसण्यास सुरुवात केली आहे.
येत्या दोन-चार दिवसात सलग पावसाची हजेरी लागण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मागील काही दिवसांपासून पावसाने सायंकाळच्या सुमारास हजेरी लावण्यास सुरुवात केली होती. तर गत दोन दिवसात पावसाने उसंत घेतली होती. परंतु सोमवारपासून पुन्हा पावसाने (Rain) जोरदार हजेरी लावली आहे. रविवारी दुपारच्या सुमारास अचानकपणे पाऊस सुरु झाल्याने सर्वांची त्रेधातिरपिट उडाली.
मंगळवारी पहाटे पाच वाजल्यापासून जोरदार पावसाला सुरुवात झाली. थोडीशीही उसंत न घेता संततधार पाऊस सुरुच होता.. त्यामुळे सकाळच्या सत्रात नोकरी, व्यवसायासाठी जाणाऱ्या मंडळींसह शाळेला निघालेल्या विद्यार्थी-विद्यार्थीनींची तारांबळा उडाली होती. जोरदार पावसामुळे लहान-मोठ्या गटारी तुडूंब भरून वाहू लागल्याने संपूर्ण कचरा आणि सांडपाणी रस्त्यावरून बाहत होते.
तर सखल भागात पाणी साचून राहिल्याने रस्त्यांना तळ्याचे स्वरुप आले होते. त्यातून वाट काढताना वाहनधारक आणि पादचाऱ्यांना कसरत करावी लागत होती.शहापूर भागातील म्हसोबा मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचून मंदिरातही पाणी शिरले होते. यड्राव फाटा-पंचगंगा साखर कारखाना रस्त्यावर दोन ठिकाणी ओढ्याला पूर आल्याने वाहतूक थांबली होती.
काही वाहनधारक पाण्यातूनच वाट काढत होते. त्याचबरोबर विक्रमनगर आरगेमळा परिसरात ओढ्याचे पाणी पात्राबाहेर येऊन ते नागरी वस्तीत शिरले. तर आमराई रोड परिसरातही काळ्या ओढ्याचे पाणी रस्त्यावरुन वाहू लागल्याने इचलकरंजी टाकवडे मार्गावरील वाहतूक थांबली होती.
शिवाय महावितरण कंपनीच्या कबनूर आणि इचलकरंजीतील हनुमाननगर या उपकेंद्रात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले होते. आणखीन थोडा वेळ पाऊस (Rain) पडला असता तर कंट्रोलरुममध्ये पाणी शिरुन वीज पुरवठा खंडीत करावा लागला असता. कबनूर ग्रामपंचायत व इचलकरंजी महापालिकेकडून याठिकाणचे पाणी काढण्याचे कसोशीने प्रयत्न सुरु होते.