कोल्हापूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलींना वश करण्यासाठी आघोरी (Aghori) प्रकार सुरू असल्याचं समोर आलं आहे. घटनास्थळी मुलींची छायाचित्र, त्यांच्या फोटोवर हळद -कुंकू, टाचण्या टोचलेलं लिंबू आणि हिरवं कापड आढळून आलं आहे. हा धक्कादायक प्रकार जिल्ह्यातील पाडळी खुर्द गावाच्या हद्दीत घडला आहे. या घटनेनं जिल्हात खळबळ उडाली आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, कोल्हापूर जिल्ह्यातील पाडळी खुर्द गावाच्या हद्दीत मुलींची काही छायाचित्रे आढळून आली आहेत. या फोटोंच्या शेजारी हळद-कुंकू, लिंबू, टाचण्या हिरवं कापड असं साहित्य देखील ठेवण्यात आलं होतं. घडलेल्या या प्रकारामुळे गावातील पालक आणि मुलींमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.
हे वाचा : जाणून घ्या आजचे राशी भविष्य दि : 16-12-22
पुरोगामी महाराष्ट्रात, आणि त्यातही पुरोगामी जिल्हा अशी ओळख असलेल्या कोल्हापुरात होणारा हा प्रकार खरंच धक्कादायक आहे. मुलींचं वशीकरण करण्यासाठी असा अघोरी (Aghori) प्रकार केल्याचा दावा गावकऱ्यांनी केला आहे.मात्र इथून पुढे असे प्रकार खपवून घेतले जाणार नसल्याचं सांगत गावकऱ्यांनी रात्रभर गस्त घालण्याचं ठरवलंय.
शिवाय गावामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे देखील बसवले जाणार आहेत. ही केवळ अंधश्रद्धा असून, अशा कोणत्याही गोष्टींना घाबरून जाऊ नये असं देखील नागरिकांनी आवाहन केलं आहे. घडलेला हा प्रकार अत्यंत निंदनीय असल्याचं सांगत गावकऱ्यांनी या प्रकरणात पोलीस ठाण्यात तक्रार करणार असल्याची माहिती दिली आहे.