अकोला जिल्ह्यातील विवरा गावात बुधवारी संध्याकाळी एक खळबळजनक अन गुढ प्रकार घडला होता. मरण (cremated) पावलेला एक तरूण चक्क उठून बोलायला लागल्याचं समोर आलं. प्रशांत मेसरे असं या २५ वर्षीय तरूणाचं नाव आहे. अनेक गुढ निर्माण करणाऱ्या या प्रकरणात पोलिसांनी प्रशांतसह त्याचा भाऊ आणि एका तांत्रिकाला ताब्यात घेतलं अन् गुन्हा दाखल केला. दरम्यान, विवरातील गावकऱ्यांना या संपुर्ण प्रकरणावरच संशय आहे.
अकोला जिल्ह्यातील पातूर तालूक्यातलं विवरा गाव आहे. बुधवारी संध्याकाळी सारं गाव दु:खात बुडालं होतं. कारण गावातील होमगार्ड असलेला २५ वर्षातील प्रशांत मेसरेच्या मृत्यूची बातमी पूर्ण गावात पसरली. तिरडीही सजली, त्याच्या अंत्ययात्रेला सुरूवात झाली अन् स्मशानाकडे जात असताना त्याच्या मृतदेहात हालचाल जाणवली. यानंतर जे झालं त्यानं एकच खळबळ उडाली.
प्रशांतचा मृतदेह थेट गावातल्या अल्पवयीन दिपक नावाच्या तांत्रिकाकडे नेण्यात आला. तिथं प्रशांत जीवंत होऊन बोलायला लागल्याची चर्चा पसरली. दरम्यान, प्रशांत गेल्या काही दिवसांपासून आजारी आहे. त्याच्या कुटूंबियांनी तांत्रिक दिपकच्या सहायाने सैलानी इथे त्याच्यावर तांत्रिक उपचार सुरू केले होते.
मात्र, बुलडाणा जिल्ह्यातील अमडापुर येथे खाजगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते, नातेवाईक पुढील उपचारासाठी त्याला अकोल्यात नेत असल्याचे सांगून घेऊन आले, रस्त्यात तो बेशुद्ध झाला. त्यानंतर विवरा गावात आणले.गावातील तांत्रिक महाराज आणि युवकाच्या नातेवाईकांनी मृत घोषित केले. यानंतर अंत्यसंस्काराची (cremated) तयारी झाली.
स्मशानभूमीकडे जात असताना वाटेतच प्रशांतच्या नातेवाईकांनी त्याचा मृतदेह तांत्रिक दीपक यांच्याकडे घेऊन गेले आणि प्रशांतमध्ये पुन्हा जीव आला. गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तांत्रिकने प्रशांतची पूजा वगैरे करून त्यांच्यात पुन्हा जिव टाकला, असा बनाव खुद्द प्रशांतसह महाराजाने केला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, या संपुर्ण प्रकरणात त्याच्या कुटूंबियांची भूमिका नेमकं काय आहे? प्रशांतने हा मृत्यूचा हा बनाव का रचला?, या प्रकरणात ‘त्या’ मांत्रिकाचा काय सहभाग आहे? याचा तपासही पोलीस करणार आहेत.तांत्रिक दिपकचा गेल्या तीन महिन्यांपासून विवरा गावात दरबार भरत आहे.
इथे भक्तीच्या नावाखाली अंगात येण्यासारखे अघोरी प्रकार होतात. या संपुर्ण प्रकरणाचा तपास अकोला पोलीस करीत आहेत. तर या प्रकरणात पोलिसांनी तांत्रिक दिपक आणि प्रशांत मेसरेसह त्याच्या भावाला ताब्यात घेतले होते.