राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांविषयींच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापले असतानाच आता सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एक मोठी घोषणा केली आहे. त्यानुसार राज्य सरकार छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखं (history) ब्रिटनमधून परत आणण्याचा प्रयत्न करणार आहे. शिवाजी महाराजांनी अफजलखानाला मारण्यासाठी वापरलेल्या वाघनखांबाबत नेहमीच चर्चा असते. ही वाघनखं इंग्लंडच्या वास्तुसंग्रहालयात आहेत.
ही वाघनखं पुन्हा भारतात आणण्यासाठी आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे पाठपुरावा करत आहोत. पुढील वर्षी होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यापूर्वी ही वाघनखं पुन्हा भारतात आणण्याचा प्रयत्न असेल, अशी माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. या आधी शिवरायांची जगदंबा तलवार परत आणण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले होते.
शिवकालीन इतिहासात (history) प्रतापगडाच्या पायथ्याशी झालेल्या अफजलखान वधाच्या घटनेला मोठे महत्त्वं आहे. या घटनेचा दाखला देत आजही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे गोडवे गायले जातात. त्यामुळे या घटनेशी संबंधित असलेल्या प्रत्येक गोष्टीबाबत शिवप्रेमींमध्ये कुतूहल आहे. याच पार्श्वभूमीवर आता शिंदे-फडणवीस सरकारने शिवरायांची वाघनखं पुन्हा भारतात आणण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.
हे वाचा : जाणून घ्या आजचे राशी भविष्य दि : 06-12-22
२०२४ साली ३५१ वा शिवराज्याभिषेक दिन साजरा केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाकडून या वर्षभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार आणि वाघनखं पुन्हा भारतात आणण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचे समजते.
छत्रपती शिवाजी महाराज (history), महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यासारख्या महापुरुषांचा राज्यपाल कोश्यारी आणि भाजपच्या नेत्यांकडून झालेल्या अपमानाचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीकडून येत्या १७ तारखेला मुंबई मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाच्या निमित्ताने सीमा भागातील मराठी भाषकांवर होत असलेल्या अन्याय, शेतकरी आणि महागाई आदी मुद्द्यांबाबत भाष्य करण्यात येईल.
भायखळा येथील जिजामाता उद्यानापासून ते आझाद मैदानापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष, विविध संस्था आणि संघटनांनी आतापर्यंत या मोर्चाला पाठिंबा दिला आहे. तसेच सत्ताधारी पक्षातील शिवप्रेमी आमदार आणि खासदारांनीही या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.