राज्यातील अनेक भागात जोरदार पावसाने (Rain) हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेक भागांतील नागरिकांचे नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्याचबरोबर पुणे जिल्ह्याला काल (12 सप्टेंबर) जोरदार पावसाने झोडपल्याने पुढच्या दोन दिवसांसाठी पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर कोकण आणि विदर्भासह मराठवाड्यात विजेच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे.
विदर्भात विजांच्या कडकडाटासह तीन दिवस मुसळधार पाऊस तर मराठवाडा भागात आज 12 सप्टेंबर रोजी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. आज 12 आणि उद्या 13 सप्टेंबर हे तीन दिवस सतर्कता बाळगण्याचं आवाहन हवामान विभागाने केले आहे.
पुण्यात ढगफुटीसदृश पाऊस
पुण्यात ढगफुटीसदृश पाऊस झालाय. पुणे आळंदी रस्त्यावरच्या दिघीमध्ये ढगफुटी झाल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी आलं होतं. परिणामी अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी जमा झालं आणि वाहतूक कोंडी झाली. या पावसाने (Rain) पुणेकरांची पुरती तारांबळ उडाली.
तर पौड परिसरातही तुफान पाऊस झाल्याने रस्त्यांना अक्षरशः ओढ्याचं आणि नाल्याचं स्वरुप आलं. तर जुन्नर तालुक्यातील बेल्हे, रानमळा, गारखिंडी परिसरात ढगफुटी सदृश्य पावसाने हाहाकार माजवला. पुराने बेल्हे जेजुरी आणि बेल्हे शिरूर हे दोन्ही महामार्ग पाण्याखाली गेलेत. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक पुराच्या पाण्यामुळे बंद करण्यात आली. तसेच रानमळा येथे पुरात शेतकऱ्यांच्या घरातील संसारउपयोगी साहित्य वाहून गेलं.
चंद्रपूरमध्ये मुसळधार पाऊस
चंद्रपूर शहराला मुसळधार पावसाने (Rain) झोडपून काढलं. या पावसामुळे शहरातील अनेक सखल भागांत पाणी साचलं. जिल्ह्याच्या अनेक भागांत आधीच चार वेळा अतिवृष्टी झाल्यानं शेतकरी हवालदिल झालाय. त्यातच आता पुन्हा पावसाने हजेरी लावल्यामुळे उरलंसुरलं पीकही हातून जाण्याचा धोका निर्माण झालाय.
हे वाचा : 19 वर्षीय विवाहितेला हुंड्यासाठी जिवंत जाळायला निघालेले इतक्यात…
तर या घाटात कोसळली दरड
नंदुरबार जिल्ह्यातील चांदशैली घाटात दरड कोसळलीय. तळोदा आणि धडगाव तालुक्याल्या जोडणाऱ्या रस्त्यावर दरड कोसळल्यानं वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. दरड बाजूला करण्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्यानं स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केलाय.
धुळ्यामध्ये चक्रीवादळ
धुळ्यामधील खरळबारी गावाला चक्रीवादळाने झोडपून काढले आहे. गावात 50 पेक्षा अधिक घरांची पडझड झालीय. यात सहा जण जखमी झाल्याची माहिती स्थानिकांनी दिलीय. गावाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने ग्रामस्थ हवालदिल झालेत. सरकारने तात्काळ पंचनामे करून मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केलीय..
या भागात मुसळधार पाऊस
नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद, अहमदनगर, पुणे, जालना, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ, नांदेड, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, रायगड, मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्याचबरोबर मुंबईत पुढच्या तीन दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय.
कोणत्या भागात ऑरेंज आणि यलो अलर्ट?
हवामान विभागाच्या माहितीनुसार कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरासाठी पुढील पाच दिवस पावासाचा (Rain) ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. कोकणात काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईसाठी आजपासून पुढील तीन दिवस काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
विदर्भात पुढील तीन दिवस सर्वत्र विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात पुढील दोन दिवस सर्वत्र विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज अमरावती, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे.
तसेच इतर ठिकाणी मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नांदेड आणि हिंगोलीत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळं आज मराठावाड्यासाठी देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.