एकाच मांडवात सख्ख्या बहिणींशी केलेलं लग्न (marriage) हे सध्या महाराष्ट्रात प्रचंड गाजतंय. २ डिसेंबर रोजी एकाच मांडवात अतुल अवताडे या तरुणाने रिंकी आणि पिंकी पाडगावकर या दोन जुळ्या बहिणींशी लग्नगाठ बांधली. या लग्नाची सोशल मीडियावर तुफान चर्चा गाजली.
मात्र, आता हा विवाहच तरुणाच्या अंगलट आला आहे. अतुलच्या विरोधात अकलूज पोलिस ठाण्यात NCR दाखल झाल्यानंतर आता महिला आयोगानंही या लग्नाची दखल घेतली आहे.महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या लग्नाबाबत एक ट्विट केलं आहे. तसंच, याबाबत कारवाईचे आदेशही दिले आहेत.
सोलापुरातील माळशिरस तालुक्यातील महाळुंग येथील अतुल अवताडे याने मुंबई येथील दोन जुळ्या आयटी इंजिनियर मुलींसोबत विवाह (marriage) केला. या अनोख्या विवाहाची चांगलीच चर्चा रंगली आहे. अतिशय थाटात झालेल्या या विवाहाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
मात्र, त्यानंतर नवरदेवाविरोधात भारतीय दंड संहिता १८६० च्या ४९४ कलमानुसार अकलूज पोलीस ठाण्यात NCR दाखल झाला आहे. असं असतानाच महिला आयोगानेही चौकशीचे आदेश दिल्याने तरुणाच्या अडचणीत वाढ झाली आहे.
महिला आयोगाने काय म्हटले?
सोलापूर येथील एका तरुणाने मुंबईतील जुळ्या बहिणींशी एकाच मांडवात लग्न केले आहे. ह्या लग्नाची सोशल मीडियातून सर्वत्र चर्चा सुरू आहे. तसेच माध्यमातून ह्या लग्नाच्या बातम्या सुरु आहेत. भारतीय दंड संहितेच्या कलम ४९४प्रमाणे हा गुन्हा आहे.
तरी सोलापुर पोलिस अधिक्षक आपण उपरोक्त बाबत चौकशी करून त्वरीत कायदेशीर कारवाई करावी. तसेच केलेल्या कारवाई बाबतचा अहवाल महाराष्ट्र राज्य महिला आयोग अधिनियम १९९३ चे कलम १२ (१) व १२ (२) अन्वये तात्काळ सादर करावा, असं ट्वीट रुपाली चाकणकर यांनी केलं आहे.
काय आहे प्रकरण?
आयटी इंजिनिअर असलेल्या रिंकी आणि पिंकी या दोघी जुळ्या बहिणी आहे. दोघींनाही एकमेकींची फार ओढ आहे. बालपणापासून एकत्र राहिलेल्या दोघी बहिणींना शेवटपर्यंत एकत्र राहायचं होतं. त्यासाठी त्यांनी एकाच तरुणाशी लग्न (marriage) करण्याचा निर्णय घेतला. अखेर दोन्ही कुटुंबाने या विवाहास मान्यता दिली होती. अकलूज वेळापूर रोडवरील गलांडे हॉटेल येथे हा अनोखा विवाह संपन्न झाला.