देशाच्या उत्तरेकडे सध्या हवामान सातत्यानं बदलत असून, नागरिकांच्या आरोग्यावर याचे थेट परिणाम होताना दिसत आहेत. हवामान खात्यानं देशाच्या उत्तरेकडे थंडीची आणखी एक लाट सक्रीय झाल्याचं सांगितलेलं असताना काही राज्यांमध्ये मात्र पावसाचा (Rain warning) शिडकावा होईल असाही अंदाज वर्तवला आहे.
दरम्यान, शुक्रवारी सकाळच्या सुमारास मुंबईतील काही भागांमध्ये पावसाची रिमझिम पाहायला मिळाली, तर महाराष्ट्रात काही भागांमध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळालं. हवामान खात्याकडून देशातील 26 राज्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पुढील दोन दिवस देशात कडाक्याची थंडी असेल, तर त्यानंतरच्या काळात मात्र थंडी ओसरताना दिसेल असं सांगण्यात आलं आहे.
साधारण 26 तारखेपर्यंत पश्चिमी झंझावातामुळं हिमालयातील वातावरणावर याचा थेट परिणाम दिसून येणार असून हवामानाच मोठे बदल अपेक्षित आहेत. परिणामी थंडी काहीशी कमी होतेय तोच दिल्ली, उत्तर प्रदेश आणि हिमाचलमध्ये काही भागांत पावसाच्या (Rain warning) सरी बरसतील.
हे वाचा : कोल्हापुर भारतीय सैन्य दलातील जवानाने उचललं टोकाचं पाऊल, घटनेने खळबळ
हवामानामध्ये होणाऱ्या बदलांमुळं 22 ते 25 जानेवारीदरम्यान पंजाबमध्ये, 22 ते 23 जानेवारीदरम्यान दिल्ली, हरियाणामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पूर्वोत्तर भागामध्ये असणाऱ्या मेघालय आणि आसाममध्येही पावसाच्या तुरळक सरी बसरतील. महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागामध्ये वातावरण ढगाळ राहील तर, काही ठिकाणी पावसाची रिमझिम पाहायला मिळेल.
हिमाचल, लडाख आणि उत्तराखंडमध्ये पुढील काही दिवसांत थंडीचं प्रमाण वाढेल. विशेषत: उत्तराखंडमध्ये पुढील 48 तासांमध्ये काही भागांत जोरदार पावसाचा (Rain warning) अंदाज वर्तवण्यात आला आहे. शिवाय काही भागांना बर्फवृष्टीचा तडाखाही बसणार आहे. ज्यामुळं येथील तापमानाच लक्षणीय घट दिसून येईल. उत्तराखंडमध्ये चमोली, उत्तरकाशी, पिथौरगढ, जोशीमठ या भागांमध्ये थंडीचा कडाका वाढेल, तर अधूनमधून पावसाच्या सरीसुद्धा बरसतील.