राज्यात जोरदार पाऊस (Rain) झाला. गडगडाटासह पावसाने हजेरी लावल्याने अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. गेले काही दिवस सातत्याने कोसळणाऱ्या पावसाने हवेत गारवा निर्माण केलाय. दरम्यान, कऱ्हा नदीला मोठा पूर आल्याने या पुराच्या पाण्यात एक कार वाहून गेली.
बारामतीत कऱ्हा नदीच्या पुलावरून कार वाहून गेली. काऱ्हाटी गावात ही घटना घडली. दोन दिवसांच्या पावसामुळे कऱ्हा नदीची पाणीपातळी वाढली. याच कऱ्हा नदीच्या पुलावरून कार घेऊन जात असताना पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांची कार वाहून गेली. पाण्याचा वेग वाढत असल्याचे लक्षात येताच डॉक्टर बारवकरांनी गाडीतून उडी मारुन जीव वाचवला.
राज्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास गमावला आहे. ऑक्टोबर महिना संपत आला तरी पाऊस सुरूच आहे. त्यामुळे काढणीला आलेलं पीक आणि काढलेल्या पिकाचं प्रचंड नुकसान झाले आहे. नाशिकच्या चांदवड तालुक्यात वादळी वा-यासह मुसळधार पाऊस (Rain) झाल्याने मका, सोयाबीन, कांद्यासह इतर पिकांचे नुकसान झाले आहे.
तर विदर्भ, मराठवाडा कोकणातही सतत पडत असलेल्या पावसाने हातातोंडाशी आलेलं पीक जमीनदोस्त झालंय…त्यामुळे त्वरीत पंचनामे करून मदत मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.सिंधुदुर्गात गडगडाटासह पावसानं हजेरी लावली. गेले काही दिवस सातत्याने कोसळणाऱ्या पावसाने हवेत गारवा निर्माण केलाय. मात्र बळीराजाची झोप उडालीये.
कारण तयार झालेली आणि कापणीला आलेली भातशेती या पावसामुळे धोक्यात आली आहे. तर पालघर जिल्ह्यात परतीच्या पावसाने पुन्हा विजांच्या कडकडाटसह दमदार हजेरी लावली. पावसामुळे कापणी केलेले भात पीक संकटात सापडलय. त्यामुळे बळीराजा पुन्हा संकटात सापडलाय. तर कासा येथे पावसामुळे एका लहान मुलाचा वीज पडून मृत्यू झालाय.
कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा मुसळधार पाऊस (Rain) झाला. यामुळं नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. अनेक सखल भागांत पावसाचं पाणी साठलं. त्यातून वाट काढणं वाहन चालकांना कठीण झालं. तर अकोल्यात गेल्या दोन दिवसांपासून संततधार सुरुये..
पावसामुळे सोयाबीन, कपाशी उत्पादक शेतक-यांसोबतच तेल्हारा तालुक्यातल्या भाजीपाला उत्पादक शेतक-यांचंही मोठं नुकसान झालंय. पावसाचं पाणी शेतात साचल्याने पीक सडण्याची भीती बळीराजाला आहे. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा आणि आकोट परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय.
शहानुर गावात जोरदार पावसामुळे गावात पूर परिस्थिती आहे. शेतीचेही प्रचंड नुकसान झाले असून शेतकरी पुन्हा हवालदिल झालाय. नाशिकच्या चांदवड तालुक्यात मुसळधार पावसामुळे मका, सोयाबीन कांद्यासह सर्व पिकांचं प्रचंड नुकसान झालंय. दरसवाडी, पिंपळद, देवरगाव, दिघवद, हिरापूर परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस (Rain) झालाय. पिकांचे पंचनामे करून त्वरित मदत मिळावी, अशी मागणी शेतक-यांनी केलीय.