देशभरात स्मार्टफोन युझर्सची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. स्मार्टफोनवर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसोबत ओटीटी प्लॅटफॉर्म वापरणाऱ्या युझर्सची संख्यादेखील अधिक आहे.ग्राहकांचा हा कल लक्षात घेऊन बहुतांश टेलिकॉम कंपन्या त्यांच्या काही प्लॅनसोबत ओटीटी बेनिफिट देतात.
रिलायन्स जिओनंदेखील (Jio ) काही प्लॅन्सवर नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम आदी ओटीटी प्लॅटफॉर्मचं सबस्क्रिप्शन मोफत देऊ केलं आहे. डेटा, कॉलिंग, एसएमएससह ओटीटी बेनिफिट देणारे जिओचे नेमके कोणते प्लॅन आहेत, हे सविस्तर जाणून घेऊ या. रिलायन्स जिओने गेल्या वर्षी देशभरात 5G नेटवर्क लाँच केलं. सध्या ही कंपनी 150पेक्षा जास्त शहरांमध्ये 5G सेवा उपलब्ध करून देत आहे.
जिओ 5G ची वेलकम ऑफर मिळाली असेल तर तुम्ही कंपनीच्या हायस्पीड 5G डेटाचा लाभ घेऊ शकता. याशिवाय जिओ पोस्टपेड युझर्सना काही ठराविक प्लॅन्सवर ओटीटी अॅप्सचं सबस्क्रिप्शन फ्री देते. जिओचा 1499 रुपयांचा प्लॅन कंपनीचा सर्वांत महागडा पोस्टपेड प्लॅन आहे. या प्लॅनमध्ये युझर्सना 300GB डाटा मिळतो. याशिवाय या प्लॅनमध्ये युझर्सना अनलिमिटेड कॉलिंग, रोज 100 एसएमएस फ्री, नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम आणि जिओ अॅप्सचं सबस्क्रिप्शन फ्री मिळतं.
हे वाचा : : संजय राऊतांच्या वादग्रस्त वक्तव्यानं पेटवलं रान! भाजप-शिंदे गट आक्रमक
जिओचा (Jio ) 999 रुपयांचा प्लॅनदेखील चांगला आहे. या प्लॅनमध्ये युझर्सना 200 GB डेटा मिळतो. प्लॅन संपल्यानंतर कंपनी प्रत्येक जीबीकरिता 10 रुपये शुल्क आकारते. या प्लॅनमध्ये कंपनी तुम्हाला आणखी तीन सिम कार्ड जोडण्याची मुभा देते. तसंच या प्लॅनअंतर्गत युझर्सना अनलिमिटेड व्हॉइस कॉल, रोज 100 एसएमएस फ्री, नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम आणि जिओ अॅप्सचं सबस्क्रिप्शन फ्री मिळतं.
रिलायन्स जिओच्या 799 रुपयांच्या प्लॅनमध्ये युझर्सना 150 GB डाटा मिळतो. त्यानंतर कंपनी 10 रुपये प्रति जीबी यानुसार शुल्क आकारते. युझर्स या प्लॅनअंतर्गत दोन आणखी सिम कार्ड्स जोडू शकतात. या प्लॅनमध्ये कंपनी युझर्सना अनलिमिटेड व्हॉइस कॉल, रोज 100 एसएमएस फ्री, नेटफ्लिक्स, अॅमेझॉन आणि जिओ अॅप्सचं सबस्क्रिप्शन बिलाच्या कालावधीपर्यंत देते.
जिओच्या 599 रुपयांच्या पोस्टपेड प्लॅनमध्ये कंपनी युझर्सना 100GB डेटा देते. डेटा संपल्यानंतर कंपनी 10 रुपये/GB यानुसार शुल्क आकारते. या प्लॅनमध्ये युझर्सना अनलिमिटेड व्हॉइस कॉल, रोज 100 एसएमएस फ्री आणि आणखी एक सिम समाविष्ट करण्यास परवानगी देते. याशिवाय या प्लॅनमध्ये युझर्सना नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम आणि जिओ अॅप्सचं सबस्क्रिप्शन फ्री मिळतं.
जिओच्या (Jio) पोस्टपेड युझर्सना 399 रुपयांच्या प्लॅनमध्ये 75 GB डेटा मिळतो. याशिवाय युझर्सना अनलिमिटेड व्हॉइस कॉल, रोज 100 एसएमएस फ्री मिळतात. या पोस्टपेड प्लॅनमध्ये युझर्सना नेटफ्लिक्स मोबाइल व्हर्जन आणि अॅमेझॉन प्राइमचं सबस्क्रिप्शन दिलं जातं. याशिवाय कंपनी जिओ अॅप्सचं सबस्क्रिप्शनदेखील देते. महत्त्वाची बाब म्हणजे, युझर्सना या सर्व प्लॅनमध्ये नेटफ्लिक्सची मोबाइल एडिशन कंपनीकडून मिळते. तसंच सर्व प्लॅनचा कालावधी हा बिलिंग सायकलच्या हिशेबानुसार असतो.












